वॉचमनची  रुपये पंधराशेची  पगाराची नोकरी ते ३ कोटी नेटवर्थ



श्री. जग्गनाथ पाटील यांची हृदय द्रावक, प्रेरणादायी व्यवसाय जिवन प्रवास कथा.. 

दुष्काळ व गरिबीमुळे बारावीतून शिक्षण सोडून मुंबईत आले. आज त्यांचे चार फ्लॅट, महिना तीन लाख कमाई आहे. काही कामानिमित्त एका ऑनलाईन मिटिंग मध्ये माझे मित्र श्री. शंकर (राजूभाई ) सुतार यांनी  माझी ओळख श्री. जगन्नाथ पाटील यांच्याशी करून दिली. तेही मूळ तासगाव (तुरीची ) येथील असलेच समजलं. ते एल आय सी एजंट आहेत व आज ते दरमहा रुपये ३ लाख रुपयांची कमाई करतात. त्यांच्याशी बोलता बोलता मला त्यांच्या व्यवसायिक प्रवासाबद्दल माहिती मिळत गेली आणि मला आश्चर्याचा एक सुखद धक्काच बसला.

मित्रांनो जगन्नाथ पाटील यांचे सुरूवातीचे दिवस अत्यंत हलाखीचे होते. शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळत नव्हती. कुटुंबांची जबाबदारी पेलवण्यासाठी मीरा रोड मधील एका कंपनीत वॉचमन म्हणून नोकरी केली. त्यांना दरमहा फक्त दीड हजार  रुपये वेतन मिळत असे. नोकरीसाठी त्यांना घोडबंदर रोड येथील साईटवर जावे लागत असे. कंपनीतून प्रवासखर्च मिळत नसे. मीरा रोड पासून घोडंबंदर पर्यंत बसने प्रवास परवडत नसे म्हणून ते पायी चालत जायचे. स्वत:च्या अशा जीवनशैलीची त्यांना चीड येऊ लागली. व शेवटी त्यांनी वॉचमनची नोकरी सोडून एलआयसी एजंट म्हणून काम सुरू केले व त्यातच स्वत:ला समर्पित केले. एल आयसी एजंट म्हणून काम करता करता आज त्यांचे सुमारे ४२०० क्लाईंट झाले आहेत. या सर्वाच्या पॉलिसीच्या कमिशनचे त्यांना दरमहा तब्बल ३ लाख रुपये मिळतात. या कामगिरीबद्दल त्यांना एलआयसी कडून बरेच अॅवॉर्डस मिळाले आहेत. तसेच त्यांना कंपनीकडून १५ दिवसांसाठी अमेरिकेची ट्रीप अॅवॉर्डमधून दिली गेली.

मित्रांनो, जगन्नाथ पाटील यांचे फार शिक्षण नव्हते. परंतु त्यांनी चिकाटी व सातत्याने एलआयसी पॉलिसी विकण्याचे काम केले. कारण त्यांना ती वॉचमनची नोकरी करताना आपल्या गरिबीची चीड येत असायची. म्हणूनच त्यांनी एलआयसी एजंट बनण्याचा धाडसी निर्णय घेतला. एकेकाळी महिना  हजार पगारावर वॉचमनची नोकरी करणारे जगन्नाथ पाटील यांचे नेटवर्थ आज तब्बल ३ कोटी आहे. योग्य वेळी त्यांनी एक बोल्ड निर्णय घेऊन चिकाटीने एलआयसी एजंट म्हणून काम केले व आपल्या परिवाराला सोन्याचे दिवस दिले. त्यांची यशोगाथा ही सर्वासाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्यापुढील वाटचालीसाठी व यशस्वी भवितव्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...!!!